कोकिसरेतील नवलाई देवीच्या अनेक आख्यायिका सांगण्यात येतात .या देवस्थानाची स्थापना सुमारे ५ हजार वर्षापूर्वी झाली असे सांगितले जाते. त्यानंतर अंदाजे १ हजार वर्षापूर्वी गावातील तळ्यात देवी वसली असल्याचे सांगू जाऊ लागले. पूर्वी हे मंदिर फक्त जांभ्या दगडाच्या सहाय्याने बनविण्यात आले होते . कालांतराने गावकऱ्यांनी मंदिराची डागडुजी केली आणि सुमारे दीडशे वर्षापूर्वी आता अस्तित्वात असणाऱ्या मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिरात नवलाईदेवीसह निनाईदेवी , ज्योतिर्लिंग तसेच भैरवनाथ मंदिराच्या मूर्ती आहेत . केवळ मोरणा विभागच नव्हे तर संपूर्ण पाटण तालुक्यातील एक जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची कीर्ती पसरली आहे.
गावकऱ्यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून नवलाईदेवी मंदिराचे अवाढव्य बांधकाम पूर्ण केले आहे.
कोकिसरे , वाठार , निमसोड , इस्लामपूर , गोंदि ते अगदी गोव्यापासूनचे भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात.तरीही हजारो भाविकांची वर्दळ असणाऱ्या या देवस्थानाकडे शासनाचे तसे दुर्लक्षच झाले आहे .या ठिकाणी अनेक मुलभूत सोई सुविधांचा अभाव आहे . वास्तविक येथील निसर्गरम्य वातावरण , दाट वनराई , दुर्मिळ वृक्षसंपदा हि सर्व पार्श्वभूमी तीर्थक्षेत्र होण्यासाठी पूरकच आहे. परंतु अजूनपर्यंत देवस्थानासाठी कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. ग्रामस्थांनी आतापर्यंत स्वखर्चातूनच या मंदिराची उभारणी तसेच जीर्णोद्धार केला आहे. या परिसरातील वातावरण अगदी बारा महिने आल्हाददायक असते. श्रावण महिन्यात येथील हिरवाई अगदी हिरवा शालू पांघरल्याप्रमाणेच भासत असते.
कोकिसरे येथील ग्रामदैवत श्री.नवलाईदेवी मंदिरचा वास्तुशांत विधी , मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ रविवार दि. १० एप्रिल व ११ एप्रिल २०१६ रोजी कारवडीतील श्री लिंगेश्वर मंदिराचे मठाधिपती प. पू. योगीराज विजयलिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
सोमवार दि ११ रोजी सकाळी ७.१५ ते दुपारी १२ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण , दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद असा कार्यक्रम पार पडला . दि १० रोजी सकाळी ८.३० ते ४ मंदिरात होमहवन , मोरगिरी ते कोकिसरे भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली . तसेच सायंकाळी ४ ते ६ नवलाई कलामंच येथे शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला . तसेच सायंकाळी ६ ते ८ या वेळात रायगड भूषण पुरस्कृत ह. भ. प. देवजी बाबर महाराज याचे जाहीर कीर्तन आणि रात्री ८ ते ९.३० वाजता सामुदायिक महाप्रसाद व रात्री १० नंतर श्रीदत्तगुरू भजनी मंडळ मुबई यांचा नवलाई जागर असा कार्यक्रम आयोजित केला गेला.
संदर्भ
मुक्तागिरी वर्तमानपत्र संकेतस्थळ दि .१०-०४-२०१६
http://www.emuktagiri.com/HomePage.aspx?PageId=8
संकलन – मा. विद्या म्हासुर्णेकर–नारकर
